मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत रविवार, दि. २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता उमरखेड येथील राजस्थानी भवन येथे भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उमरखेड महसूल उपविभागाच्या वतीने आयोजित या शिबिरामध्ये महागाव व उमरखेड तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार किसनराव वानखेडे राहणार असून जिल्हाधिकारी विकास मीना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उपविभागीय अधिकारी राम मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले असून महसूल प्रशासनाने यासाठी व्यापक तयारी पूर्ण केली आहे.
या समाधान शिबिरात महसूल विभागासह पंचायत राज, कृषी, आरोग्य, शिक्षण, वन, सहकार, भूमी अभिलेख,अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालविकास, सामाजिक न्याय,बँका तसेच इतर महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या विविध अर्जांवर तत्काळ कार्यवाही करणार आहेत.
शिबिरामध्ये सातबारा उतारा,फेरफार, उत्पन्न, जात, निवासी व इतर प्रमाणपत्रे, राशन कार्ड, आधार व आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, पीक कर्ज, घरकुल, पांदण रस्ते, शासकीय अनुदान तसेच विविध कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन व लाभ देण्यात येणार आहे.
शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या दैनंदिन अडचणी जलदगतीने निकाली काढण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. विविध कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याऐवजी एकाच ठिकाणी अनेक विभागांच्या सेवा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे. त्यामुळे या शिबिराला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
तहसीलदार अभय मस्के (महागाव) आणि तहसीलदार राजू सुरडकर (उमरखेड) यांनी महागाव व उमरखेड तालुक्यातील शेतकरी,महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लोकाभिमुख शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.यापूर्वी महागाव येथे झालेल्या महाराजस्व समाधान शिबिराला हजारो लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.त्याच धर्तीवर उमरखेड येथे होणारे हे शिबिरही नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देणारे आणि शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविणारे ठरेल, असा विश्वास महसूल प्रशासनाने व्यक्त केला आहे.