संज्ञा संवर्धन संस्था संचालित कल्पतरू विशेष शाळा, बुटीबोरी येथे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत इको-फ्रेंडली गणपतीची विधिवत स्थापना करण्यात आली.
यावर्षीच्या गणेशोत्सवाची संकल्पना ‘पर्यावरण संवर्धन – झाडे लावा, झाडे जगवा’ अशी ठेवण्यात आली आहे.
गणपतीच्या सजावटीतून पर्यावरणाचे रक्षण, वृक्षसंवर्धन आणि निसर्गाची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला.शाळेतील स्टाफच्या उपस्थितीत गणपतीची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. साधेपणा, श्रद्धा आणि पर्यावरणपूरक विचार यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.
‘बाप्पाची भक्ती करताना निसर्गाचीही सेवा करूया, झाडे लावूया, झाडे जगवूया आणि पुढील पिढीसाठी हिरवेगार भविष्य घडवूया,’ असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजविण्याचे माध्यम ठरावा, या उद्देशाने कल्पतरू विशेष शाळेने घेतलेला हा पर्यावरणपूरक उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.