देशभक्तीपासून विरहापर्यंत, नात्यांच्या भावबंधांपासून सामाजिक वास्तवापर्यंत, निसर्गापासून पर्यावरण संवर्धनापर्यंत आणि तांड्याच्या वेदनेपासून स्त्रीजन्माच्या व्यथेपर्यंत विविध भावछटांनी नटलेल्या एकाहून एक सरस कवितांनी यवतमाळकर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. विदर्भ साहित्य संघ, शाखा यवतमाळच्या वतीने आयोजित पहिल्या कविसंमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देवेंद्र जोशी यांच्या ‘ने पवनाने…’ या कवितेने कविसंमेलनाची सुरुवात झाली. एडनच्या तुरुंगात मातृभूमीच्या ओढीने व्याकूळ झालेल्या वासुदेव बळवंत फडके यांच्या मनोभूमिकेचे प्रभावी चित्रण या कवितेतून झाले.विद्या खडसे आणि कविता शिरभाते यांच्या कवितांनी देशप्रेमासोबतच नागरिक कर्तव्याची जाणीव करून दिली. कल्याणी मादेश्वार यांच्या ‘बापू’ या विडंबनात्मक कवितेतून भ्रष्ट व्यवस्थेचे वास्तव मांडण्यात आले.
नागपूरच्या कवयित्री श्रेया पाटील यांच्या ‘तू गेल्यावर’ या विरहकवितेने रसिकांच्या भावविश्वाला स्पर्श केला. जयंत चावरे यांच्या ‘गाणे होईन म्हणतो’ या कवितेलाही दाद मिळाली. महेश अडगुलवार यांच्या ‘बाप’ या कवितेतून पित्याच्या मायेचे आणि नात्यांच्या अदृश्य धाग्यांचे भावस्पर्शी दर्शन घडले. डॉ. ललिता घोडे यांनी श्रावणातील निसर्गसौंदर्य शब्दबद्ध केले, तर स्मिता भोईटे यांच्या ‘साजुणी’मधून सालदाराच्या वाट्याला आलेल्या वेदनांचे वास्तव उलगडले.
उपेक्षित तांड्याचे जगणे, बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची धडपड आणि नव्या पिढीला परिवर्तनाचे आवाहन करणारी हितेश राठोड यांची ‘तांडा’ ही कविता विशेष लक्षवेधी ठरली. बाबा देशपांडे यांच्या ‘झुळूक’ या निसर्गकवितेने रसिकांची विशेष पसंती मिळवली. तरुण कवी हितेश शृंगारे यांच्या ‘पृथ्वीचे संरक्षण’ या कवितेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
अर्चना वासेकर यांच्या ‘जीवनगाणे’ या गेय कवितेने सुख-दुःखांच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या मानवी मनाचा वेध घेतला. संतोष इसनकर यांच्या ‘मृत्यो… तूच खरा शहेनशहा’ या कवितेने मृत्यूच्या सार्वत्रिक सत्याची जाणीव करून देत रसिकांना अंतर्मुख केले. मनोहर बडवे यांच्या गझलस्वरूपातील कवितेने संमेलनाची रंगत वाढवली.
डिजिटल युगातील बदलत्या नात्यांचे प्रतिबिंब दाखवणारी विशाखा येवतकर यांची ‘ऑनलाइन प्रेम’ ही कविता वेगळ्या आशयामुळे चर्चेची ठरली. सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी डॉ. स्वप्नील मानकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत रसिकांना मनमुराद हसवले. ‘लोहगड प्रकरणा’नंतर पती-पत्नीच्या जुगलबंदीवर आधारित त्यांच्या कवितेला दणदणीत प्रतिसाद मिळाला. सुप्रसिद्ध कवी नीलकृष्ण देशपांडे यांच्या स्त्रीजन्माच्या व्यथेचे भावपूर्ण चित्रण करणाऱ्या कवितेने या काव्यसोहळ्याचा समारोप झाला.
कविसंमेलनाच्या प्रास्ताविकातून डॉ. सतपाल सोवळे यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. प्रमुख अतिथी डॉ. रमाकांत कोलते यांनी कवितेचे प्रयोजन, कवितेच्या विविध व्याख्या आणि कवीचे सामाजिक दायित्व यावर मार्गदर्शन केले. केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य विवेक कवठेकर यांनी शाखांमधील समन्वय आणि भविष्यातील उपक्रमांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धाचे सूत्रसंचालन प्रा. अतुलकुमार सरडे यांनी, तर कविसंमेलनाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर तिखे यांनी केले. प्रा. विनोद भगत यांनी आभार मानले. उपाध्यक्ष नितीन पखाले यांच्या हस्ते अतिथींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे, अॅड. जीवन पाटील, धनंजय पांडे, अनिरुद्ध पांडे आणि मोरेश्वर पुंड यांच्या सक्रिय सहभाग व मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन झाले. विविध विषय, भावछटा आणि काव्यप्रकारांनी समृद्ध झालेल्या या पहिल्याच कविसंमेलनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यवतमाळच्या साहित्यविश्वात नव्या काव्यपर्वाची दमदार सुरुवात ठरला.