स्वतःची सुरक्षा हीच खरी शक्ती’; निजधाम आश्रम विद्यालयातील विद्यार्थिनींना ‘गुड टच-बॅड टच’चे धडे मुडाणा येथे वर्ग ८ ते १२ मधील विद्यार्थिनींसाठी जनजागृतीपर कार्यक्रम
स्वतःची सुरक्षा हीच खरी शक्ती’; निजधाम आश्रम विद्यालयातील विद्यार्थिनींना ‘गुड टच-बॅड टच’चे धडे मुडाणा येथे वर्ग ८ ते १२ मधील विद्यार्थिनींसाठी जनजागृतीपर कार्यक्रम
निजधाम आश्रम उच्च माध्यमिक विद्यालय, मुडाणा येथे वर्ग ८ ते १२ मधील विद्यार्थिनींसाठी ‘गुड टच-बॅड टच’ या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थिनींमध्ये चांगला व वाईट स्पर्श याबाबत जागरूकता निर्माण करणे, असुरक्षित परिस्थिती ओळखणे, स्वसंरक्षणाच्या उपाययोजनांची माहिती देणे तसेच आत्मविश्वास आणि योग्य निर्णयक्षमता विकसित करणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमादरम्यान ‘स्वतःची सुरक्षा हीच खरी शक्ती’ हा संदेश देत विद्यार्थिनींना स्वतःचे संरक्षण कसे करावे, संशयास्पद किंवा असुरक्षित परिस्थितीत कोणती भूमिका घ्यावी, तसेच प्रसंगी विश्वासू व्यक्तींकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून मदत कशी मागावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय, पुसद येथील मार्गदर्शक प्रा. डॉ. स्वाती दळवी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सदैव सजग राहून कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी न घाबरता आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास निजधाम आश्रम संस्था, मुडाणा येथील अध्यक्ष परशराम वानखेडे, मुख्याध्यापक सावंत, प्रशासक सतीश जाधव, तसेच भाविक मॅडम, प्रा. अमोल बोक्से यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनींची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या मार्गदर्शनपर उपक्रमामुळे मुलींमध्ये स्वसंरक्षणाबाबत जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार आहे.