पात्र वृद्ध कलावंतांना डावलल्याचा आरोप; निवड प्रक्रियेत आर्थिक देवाण-घेवाणीची चौकशी करण्याची मागणी

  लोकवेध न्यूज नेटवर्क / २१ऑगस्ट.

 

 

महागाव :

 

 पात्र वृद्ध कलावंतांची निवड करताना आर्थिक देवाण-घेवाण करून अपात्र व्यक्तींची निवड करण्यात आल्याचा गंभीर आरोप महागाव तालुक्यातील गायक दलितानंद ना. खडसे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

खडसे यांनी निवेदनात म्हटले आहे की, ते गेल्या अनेक वर्षांपासून गायनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. संत तुकडोजी महाराज यांचे भजन, अभंग, भक्तिगीत, भावगीत, दारूबंदी, व्यसनमुक्ती, गुटखाबंदी, महिला अत्याचारविरोधी तसेच वृद्ध-भिमगीते आदी विषयांवर गायन करून जनजागृती करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

सन २०१९-२०, २०२०-२१ तसेच २०२२-२३ या कालावधीत विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम केल्याचे पुरावे, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे सादर करूनही वृद्ध कलावंतांच्या निवडीत आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, महागाव तालुक्यात पात्र वृद्ध कलावंत म्हणून निवड झालेल्या व्यक्तींच्या फाईली व स्वतःची फाईल यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

निवड प्रक्रियेत काही अपात्र व्यक्तींना आर्थिक देवाण-घेवाण करून पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यापूर्वी सन २०२२ मध्येही आपण पात्र असताना तत्कालीन निवड समितीतील पदाधिकाऱ्याला पैसे न दिल्यामुळे आपले नाव पात्र यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यामुळे यावेळीही आपल्यावर अन्याय झाल्यास प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, जिल्हाधिकारी तथा साहित्यिक व वृद्ध कलावंत निवड समितीचे अध्यक्ष तसेच पंचायत विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, वृद्ध कलावंतांच्या निवड प्रक्रियेतील पारदर्शकता आणि पात्रतेच्या निकषांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या या आरोपांची प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते, याकडे महागाव तालुक्यातील कलावंतांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या