नागपूरच्या ज्येष्ठ नागरिकास महागावमध्ये मारहाण करून २४ हजार लुटले;  पोलिसांनी २० मिनिटांत पाच आरोपींना केले जेरबंद

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / १८ जून

 

महागाव :-

 

बसस्थानकाचा पत्ता विचारणाऱ्या नागपूर येथील ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकास मारहाण करून तब्बल २४ हजार रुपये लुटणाऱ्या पाच आरोपींचा अवघ्या २० मिनिटांत पर्दाफाश करत महागाव पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तीन प्रौढ आरोपींसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील २१ हजार १०० रुपयांची रोख रक्कम आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी सुभाष रामकृपाल तिवारी (वय ६०, रा. नागपूर) हे मंगळवार दि. १७ जून रोजी रात्री महागाव येथे आले होते. जुने बसस्टँड परिसरात बसस्थानकाचा शोध घेत असताना मोटारसायकलवर आलेल्या तीन तरुणांनी त्यांना अडवून चापटांनी मारहाण केली आणि खिशातील ४०० रुपये हिसकावून घेतले.यानंतर काही क्षणांतच आणखी दोन जण मोटारसायकलवर तेथे आले. त्यांनी बसस्टँड दाखवतो असा बहाणा करून तिवारी यांना जबरदस्तीने मोटारसायकलवर बसविले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या मागील निर्जन भागात नेऊन पाचही आरोपींनी त्यांना मारहाण केली व खिशातील २३ हजार ६०० रुपये बळजबरीने काढून घेतले. अशाप्रकारे एकूण २४ हजार रुपयांची रक्कम लुटून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(२) व १४०(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अनोळखी असल्याने त्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. विविध पथके तयार करून संशयितांची चौकशी करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे डिगांबर विलास नरवाडे (वय २७), बुद्धभूषण महेंद्र बन्सोडे (वय २२), बुद्धभूषण रमेश कांबळे (वय २६) तसेच दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले.पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यानंतर त्यांच्या अंगझडतीत २१ हजार १०० रुपयांची रोख रक्कम आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले.

विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यात महागाव पोलिसांना यश आले. त्यामुळे या धाडसी आणि तत्पर कारवाईबद्दल नागरिकांकडून महागाव पोलिसांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे,पोलीस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे,नापोकॉ. वसीम शेख, राजू शरमते,पोलीस शिपाई स्वप्निल रायवाडे,गणेश थिटे तसेच चालक विवेक पारडकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या