महागावात महसूल विभागाचा अवैध रेती माफियांना दणका; तीन टिप्पर जप्त

लोकवेध न्यूज नेटवर्क / १७ जून.

महागाव :-

 

महागाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने बुधवारी रात्री धडक कारवाई करत रेतीची वाहतूक करणारे तीन टिप्पर जप्त केले.या कारवाईमुळे अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाने पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

 

उपविभागीय अधिकारी राम मुळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने १७ जून रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मुडाणा, महागाव आणि फुलसावंगी परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान विनापरवाना रेतीची वाहतूक करणारे तीन टिप्पर आढळून आले.तपासणीदरम्यान एमएच-४० सीडी-३८९०, जेएच-०२ एडी-५६८० आणि जेएच-०२ एडी-८१६० या क्रमांकाच्या टिप्परमधून रेतीची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले.प्रत्येक वाहनामध्ये सुमारे दोन ब्रास रेती आढळून आली.मात्र, संबंधित वाहनचालकांकडे आवश्यक परवाने आणि कागदपत्रे नसल्याने महसूल विभागाने तिन्ही वाहने ताब्यात घेतली.

जप्त करण्यात आलेली वाहने पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय,उमरखेड येथे जमा करण्यात आली आहेत.

 

महसूल विभागाने गेल्या काही दिवसांपासून अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. शासनाच्या महसुलाचे नुकसान टाळणे आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही कारवाई उपविभागीय अधिकारी राम मुळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच तहसीलदार अभय मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.यावेळी मंडळ अधिकारी गजानन सुरोशे (बिटरगाव), मंडळ अधिकारी मारुती एकुलवार (महागाव), महसूल सहाय्यक अक्षय बोनगुलवार आणि शिपाई मिलिंद पानपट्टे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

———————————–

अवैध रेती वाहतुकीविरोधात मोहीम सुरूच

महसूल प्रशासनाकडून अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच, परिसरात कुठेही अवैध रेती उत्खनन किंवा वाहतूक सुरू असल्याची माहिती नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला द्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी राम मुळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या