यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला गावठी बनावटीच्या देशी पिस्तुलासह अटक केली.आरोपीकडून एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंदे, अग्नीशस्त्रे,गुंगीकारक पदार्थांची तस्करी आणि गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ९ जून रोजी महागाव परिसरात गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली. दरम्यान या माहितीच्या आधारे अंबोडा गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावरील अतिथी हॉटेल परिसरात एक संशयित इसम गावठी पिस्तूल घेऊन थांबला असल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. घटनास्थळी धाड टाकून संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने आपले नाव रवी संतोष शिंगारे (२९), रा. धम्मनगर, श्रीरामपूर, ता. पुसद असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला लपवून ठेवलेले गावठी बनावटीचे देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.जप्त केलेल्या पिस्तुलाची किंमत सुमारे ३० हजार रुपये, तर काडतुसाची किंमत १ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे,पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड यांच्यासह संतोष भोरगे,सुनील पंडागळेसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग घेतला.