विशेष मुलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या कलात्मक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संज्ञा संवर्धन संस्था संचालित कल्पतरू विशेष शाळा, बुटीबोरी यांच्या वतीने रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ५.३० वाजता प्लॅटिनम ज्युबिली हॉल (मुंडले हॉल), अंध विद्यालय, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-१० येथे करण्यात आले आहे.या सांस्कृतिक कार्यक्रमात विशेष मुले आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार असून, त्यांच्या कलेतून आत्मविश्वास, जिद्द, सर्जनशीलता आणि आनंदाचा सुंदर आविष्कार अनुभवायला मिळणार आहे.
विशेष मुलांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळावी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा आणि समाजाने त्यांच्या क्षमतांना सकारात्मक दृष्टिकोनातून ओळखावे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमोटर व व्यवस्थापकीय संचालक अरुण भंडारी,तसेच रामकृष्ण मठ, नागपूरचे अध्यक्ष स्वामी राघवेंद्रानंदजी यांची उपस्थिती लाभणार आहे.
विशेष मुलांमध्येही असामान्य कलागुण, प्रतिभा आणि स्वप्ने असतात. त्यांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि समाजाचे पाठबळ मिळाल्यास ते आपल्या कौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करू शकतात.या भावनेतून आयोजित करण्यात आलेले हे स्नेहसंमेलन विशेष मुलांच्या आनंदाचा आणि त्यांच्या कलागुणांच्या गौरवाचा सोहळा ठरणार आहे.
आयोजित या कार्यक्रमाला नागरिक, पालक, हितचिंतक आणि समाजातील सर्व घटकांनी सहकुटुंब उपस्थित राहून विशेष मुलांचा उत्साह वाढवावा,त्यांच्या कलागुणांना दाद द्यावी आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे,असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.