वाकोडी येथे वसिफ भाई मित्र मंडळातर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न! शेकडो नागरिकांनी घेतला लाभ; हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचे घडले दर्शन

लोकवेध न्यूज नेटवर्क / १५ ऑक्टोंबर. 

 

महागाव :- 

 

सामाजिक बांधिलकी जपत वसिफ भाई मित्र मंडळाच्या वतीने वाकोडी येथे परिसरातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शेकडो नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

 

या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत रक्तदाब (बीपी), मधुमेह (ब्लड शुगर), ईसीजी (ECG) तसेच सामान्य शारीरिक तपासणी करण्यात आली. परिसरातील प्रसिद्ध डॉक्टर सरफराज सुरैया यांच्या वैद्यकीय पथकाने रुग्णांची तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांना आवश्यक औषधोपचार व आरोग्याची काळजी घेण्याबाबत मोलाचा सल्ला देण्यात आला.

 

सामाजिक बांधिलकीतून आरोग्यसेवेचा स्तुत्य उपक्रम

 

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, आजारांचे वेळेवर निदान व्हावे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

 

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन!

 

या आरोग्य शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे वसिफ भाई मित्र मंडळामध्ये हिंदू-मुस्लीम समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन सामाजिक कार्यात योगदान देत आहेत. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन समाजसेवेचा वसा जपणाऱ्या मंडळाच्या या उपक्रमातून गावातील सामाजिक सलोखा, एकता आणि बंधुभावाचे दर्शन घडले. सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राबविलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला.

 

मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान

 

या आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी वसिफ खान हफिज खान पठाण, शेख फरमान शेख रहेमान, आदम खान अय्युब खान पठाण, शंकर गणेश खंडागळे, साहेबराव नारायण केशवे, गोरख चंपत खंडागळे, रामराव भगवान पोटे, खंडू चंपत केशवे, शेख शकुर शेख अहमद, विठ्ठल रामचंद्र देशमुख, विठ्ठल रामा शिंदे, माधव लक्ष्मण नेमाडे, रंगराव माधवराव गारोळे, संतोष भगवान पोटे, बाबू शामराव केशवे, शेख सलमान शेख वकील आणि संतोष विठ्ठल शिंदे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सर्वांच्या एकजुटीने आणि सहकार्याने हे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. भविष्यातही आरोग्य, शिक्षण आणि इतर सामाजिक क्षेत्रांत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.समाजसेवा, सर्वधर्मसमभाव आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या वसिफ भाई मित्र मंडळाच्या या उपक्रमामुळे वाकोडी परिसरात समाधान व्यक्त केले जात असून, मंडळाच्या सामाजिक कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या