पाळीव श्वानांना संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळावे आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मुडाणा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आयोजित करण्यात आलेली मोफत श्वान लसीकरण मोहीम आज उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली.
या लसीकरण मोहिमेत एक लॅब्राडोर (लेब्रा), एक पॉमेरेनियन (पोस्ट) आणि आठ पाळीव श्वान अशा एकूण १० श्वानांचे मोफत लसीकरण करण्यात आले. पशुवैद्यकीय विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्वानांना आवश्यक लसीकरण करण्यात आल्याने पशुपालकांमध्येही समाधान व्यक्त करण्यात आले.
पाळीव श्वानांचे नियमित लसीकरण करणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, विविध संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी लसीकरणाची भूमिका महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील श्वानमालकांना मोठा दिलासा मिळाला.
पाळीव प्राण्यांच्या आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा लसीकरण मोहिमा सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे यावेळी पशुपालकांकडून व्यक्त करण्यात आले.