अपघातग्रस्त श्यामच्या मदतीला धावले साहेबराव कांबळे मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची व्यवस्था करण्याची घेतली जबाबदारी; कुटुंबालाही आर्थिक मदतीचा हात

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०८ सप्टेंबर.

 

 उमरखेड :- 

 

 

मौजे गाडी, ता. उमरखेड येथील तरुण सहकारी श्याम तारमेकवाड यांच्यावर वर्षभरापूर्वी कामानिमित्त बाहेरगावी असताना काळाने मोठा आघात केला. एका भीषण अपघातात त्यांच्या कमरेखालील भागाला गंभीर दुखापत झाली. या दुर्घटनेला तब्बल एक वर्ष उलटून गेले असून, कमरेखालील भाग निकामी झाल्याने श्याम यांचे जीवन अंथरुणाला खिळले आहे.

घरातील कर्ता पुरुषच अशा अवस्थेत गेल्याने तारमेकवाड कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. औषधोपचार, दैनंदिन गरजा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी यामुळे कुटुंबासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून या कठीण परिस्थितीत श्याम तारमेकवाड यांनी उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नेते साहेबराव कांबळे यांच्याशी फोनवर संपर्क साधून आपली व्यथा मांडली.

दरम्यान श्याम यांची परिस्थिती समजल्यानंतर कांबळे यांनी विलंब न करता आज सकाळी थेट गाडी येथे जाऊन श्याम व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.यावेळी त्यांनी कुटुंबाची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.केवळ आश्वासन देण्यापेक्षा पुढील उपचारासाठी मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून आवश्यक वैद्यकीय उपचाराची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी साहेबराव कांबळे यांनी स्वीकारली.तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या परीने आर्थिक मदतीचा हातही दिला.

संकटाच्या काळात एखाद्या गरजू कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हेच खरे समाजकारण असल्याचे या घटनेतून दिसून आले.श्याम यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी कांबळे यांनी दाखविलेली संवेदनशीलता परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

आर्थिक मदत ही केवळ पैशांची मदत नसून,संकटात सापडलेल्या कुटुंबाला जगण्याची नवी उमेद देणारी ठरते. श्याम यांच्या पुढील उपचारांना यश मिळून त्यांना पुन्हा निरोगी आयुष्य लाभावे,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या