विशेष विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; कल्पतरू स्कूलमध्ये शिक्षक दिनासह श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी 

 

बुटीबोरी, नागपूर | ०८ सप्टेंबर .

 

संज्ञा संवर्धन संस्था संचालित कल्पतरू विशेष स्कूल, बुटीबोरी येथे शिक्षक दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.विशेष विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला आनंद आणि उत्साहाची अनोखी किनार लाभली.

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. यावेळी विशेष शिक्षिका हेमलता मलवार आणि सौ. संध्या जवंजाळ यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करणारी प्रेरणादायी मनोगते व्यक्त केली. उपस्थित पालकांनीही शिक्षक दिनानिमित्त आपले विचार मांडत शिक्षकांप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त केला.

 

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व स्टाफचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत त्यांच्या समर्पित कार्याचे कौतुक करण्यात आले.

 

दरम्यान, श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधेची आकर्षक वेशभूषा साकारत मनमोहक सादरीकरण केले.भक्तिगीते, नृत्य तसेच श्रीकृष्णाच्या बाललीलांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या निरागस अभिनयाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

 

जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. दहीहंडी फोडल्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेला जल्लोष आणि आनंदाने परिसर दुमदुमून गेला.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष. रवींद्र सावजी, सचिव डॉ. राजेश्वर उत्तरवार, गौरी उत्तरवार, हिमगौरी देशपांडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

 

विशेष विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांच्या क्षमतांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिक्षक दिनाचा आदर आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा भक्तिमय उत्साह यांचा सुंदर संगम साधला गेला.

आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या