महागावात प्रबोधनाचा जागर; ‘न समजलेले आईबाप समजून घेताना’ या विषयावर प्रा. वसंत हंकारे यांचे मार्गदर्शन

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०९ ऑक्टोबर.

 

महागाव:-

 

आजच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानप्रधान जीवनशैलीत बदलत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेला नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न महागावात होणार असून, पालक आणि मुलांमधील नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारा प्रबोधनाचा जागर शनिवार, १० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते, विचारवंत व समाजप्रबोधनकार प्रा. वसंत हंकारे यांचे ‘न समजलेले आईबाप समजून घेताना’ या विषयावर विशेष व्याख्यान कृषी उत्पन्न बाजार समिती, महागाव येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

नगरसेविका ॲड. सौ. जयश्री संजय नरवाडे आणि महागाव तालुका पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

गजानन वाघमारे (संपादक, साप्ताहिक लोकचिंतन),शिवराज संजय नरवाडे आणि कु. सानिका संजय नरवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे कुटुंबातील संवादाचे स्वरूप झपाट्याने बदलत असून,पालक आणि मुलांमधील भावनिक नाते अधिक दृढ करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘न समजलेले आईबाप समजून घेताना’ हा विषय निवडण्यात आला आहे. या व्याख्यानातून आई-वडिलांचे कष्ट, त्याग, अपेक्षा, मुलांच्या भावविश्वातील बदल तसेच कुटुंबातील नात्यांमधील वाढते अंतर यावर प्रा. हंकारे आपल्या ओघवत्या शैलीत विचार मांडणार आहेत.

किशोरवयीन मुलांमधील शारीरिक व मानसिक बदल, पालक-मुलांमधील संवाद, अभ्यासाचे नियोजन, करिअर निवडीतील संभ्रम, मोबाईल व सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, तसेच वाईट संगतीपासून दूर राहण्याची गरज या विषयांवरही ते मार्गदर्शन करणार आहेत. तरुणाईने जीवनात नैतिक मूल्ये, माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम जपण्याचा संदेशही या व्याख्यानातून दिला जाणार आहे.

प्रा. वसंत हंकारे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय वक्ते म्हणून ओळखले जातात. सामाजिक विषयांवरील प्रभावी प्रबोधनाबरोबरच त्यांनी अभिनय क्षेत्रातही आपली वेगळी छाप निर्माण केली असून, ‘अथांग’ आणि ‘विठू माझा भाऊराया’ यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ शुभेच्छा किंवा सत्कारापुरता कार्यक्रम न ठेवता समाजप्रबोधनाचा संदेश देण्याचा स्तुत्य प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. महागाव व परिसरातील पालक, युवक-युवती, महिला आणि सर्व नागरिकांनी या विचारप्रवर्तक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रा. वसंत हंकारे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या