विशेष मुलांच्या भविष्यासाठी ५ कोटींचा ‘कॉर्पस फंड’; संज्ञा संवर्धन संस्थेचा सेवाकार्याला कायमस्वरूपी आधार देण्याचा संकल्प

लोकवेध न्यूज नेटवर्क / १६ ऑगस्ट 

 

बुट्टीबोरी/ नागपूर :-

 

दिव्यांग व्यक्ती आणि विशेष मुलांसाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले सेवाकार्य पुढील अनेक दशके अखंडपणे सुरू राहावे, यासाठी संज्ञा संवर्धन संस्थेने सुमारे ५ कोटी रुपयांचा भक्कम Corpus Fund (कायमस्वरूपी निधी) उभारण्याचा संकल्प केला आहे. या निधीतून मिळणाऱ्या व्याजाच्या माध्यमातून संस्थेचे सेवाकार्य आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि शाश्वत करण्याचा मानस आहे.

विशेष मुलांच्या शिक्षण, संगोपन आणि सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या या कार्याला भविष्यातही सातत्याने बळ मिळावे, यासाठी समाजातील संवेदनशील व्यक्ती, दानशूर नागरिक आणि हितचिंतकांनी आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

या उपक्रमाकडे केवळ देणगी म्हणून न पाहता, विशेष मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची गुंतवणूक म्हणून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज दिलेली छोटीशी आर्थिक मदत भविष्यात अनेक विशेष मुलांच्या आयुष्याला मोठा आधार देऊ शकते, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.

या कायमस्वरूपी निधीच्या माध्यमातून मिळणारे व्याज तसेच नियमित स्वरूपातील योगदान यामुळे सध्या सुरू असलेले सेवाकार्य भविष्यातही आर्थिक अडचणींशिवाय सुरू ठेवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या सामाजिक उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन सेवाकार्याला दीर्घकालीन बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Corpus Fund साठी योगदान देताना “CONTRIBUTION FOR CORPUS” असा उल्लेख करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“विशेष मुलांच्या स्वप्नांना आर्थिक आधार देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजाने एकत्र उभे राहावे,” या भावनेतून संज्ञा संवर्धन संस्थेचे सचिव डॉ. राजेश्वर म. उत्तरवार यांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या