संज्ञा संवर्धन संस्था संचालित कल्पतरू विशेष शाळा, बुटीबोरी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे सचिन पोशट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.
दरम्यान यानंतर विशेष विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मार्च पास सादर केला. विद्यार्थ्यांनी दाखविलेली शिस्त, आत्मविश्वास आणि उत्साह उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले. टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शारीरिक कवायतीनेही उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते तसेच स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे सादर केली. निषीद दमई व कु. वेदिका मते यांनी प्रभावी भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले.देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक नृत्यामुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली.
प्रमुख पाहुणे सचिन पोशट्टीवार यांनी विशेष विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. मार्च पास, शारीरिक कवायत, देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सामूहिक नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दाखविलेली कला, शिस्त, आत्मविश्वास आणि उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सावजी, सचिव डॉ. राजेश्वर उत्तरवार, गौरी उत्तरवार मॅडम, हिमगौरी देशपांडे मॅडम यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्”च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. यानंतर विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कल्पतरू विशेष शाळेचा स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला.