टाळ-मृदंगाच्या निनादात एल. के. हायर सेकंडरी विद्या मंदिरात अवतरली विठ्ठलभक्ती; चिमुकल्यांनी अनुभवली आषाढी वारीची दिव्य अनुभूती

 लोकवेध न्यूज नेटवर्क / २६ जुलै.

महागाव :- 

 आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त महागाव येथील एल. के. हायर सेकंडरी विद्या मंदिरमध्ये भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आषाढी वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी,वारकरी, टाळकरी, मृदंगवादक तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान करून संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलमय केला.

 ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी”, “विठ्ठल… विठ्ठल…” या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध दिंडी काढत आषाढी वारीची परंपरा जिवंत केली. दिंडीनंतर पारंपरिक रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रत्यक्ष परिचय झाला.

कार्यक्रमात साकारण्यात आलेला विठ्ठल-रुक्मिणीचा आकर्षक देखावा आणि विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. चिमुकल्यांचा निरागस भक्तिभाव, टाळ-मृदंगाचा निनाद आणि उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले.

 विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी,संत परंपरेची ओळख व्हावी आणि महाराष्ट्राच्या वारकरी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत दिंडी, वारी आणि रिंगण सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला.

 या,कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आषाढी वारीचा हा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात भक्ती, संस्कार आणि परंपरेची सुंदर जाणीव रुजवणारा संस्मरणीय सोहळा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या