संतांच्या विचारांनी भारावले प्रियदर्शनी कॉन्व्हेंट; आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / २५ जुलै.

 

 महागाव :- 

 

महागाव येथील प्रियदर्शनी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा पवित्र सण अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील महान संतांच्या वेशभूषेत सहभागी होत संतपरंपरेचे जिवंत दर्शन घडविले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावता माळी, संत गोरा कुंभार आदी संतांची वेशभूषा साकारली. संतांच्या जीवनकार्याची आणि समाजप्रबोधनातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केली. त्यामुळे संपूर्ण शाळेचा परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची ओळख करून देत सत्य, समता, प्रेम, भक्ती, मानवता आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व पटवून देणे हा होता. संतांच्या शिकवणीतून विद्यार्थ्यांना चांगले संस्कार, भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

उपस्थित पालक व मान्यवरांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्ये रुजविणारे असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या