विमा म्हणजे जीवनाची सुरक्षा कवच ;युनियन बँकेच्या जनजागृती शिबिरात हिमांशू रत्नपारखी यांचे मार्गदर्शन

लोकवेध न्यूज नेटवर्क  / १८ मे.

 

महागाव / काळी (दौ.)

 

युनियन बँक शाखा महागावच्या वतीने काळी (दौ.) परिसरातील पेढी गावात आयोजित करण्यात आलेल्या विशेष जनजागृती शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात सन्माननीय हिमांशू रत्नपारखी यांनी उपस्थित ग्रामस्थांना विमा योजनांचे महत्त्व, कर्ज परतफेडीची जबाबदारी तसेच सामान्य जीवनात आर्थिक नियोजनाचे स्थान याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले.

शिबिरासाठी हिमांशू रत्नपारखी यांनी सकाळी लवकर काळी (दौ.) येथील बँक शाखेला भेट देऊन कार्यक्रमाची पाहणी केली. त्यानंतर सकाळी आठ वाजताच्या सुमारास पेढी गावातील कॅम्पमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावत ग्रामीण भागातील महिला व पुरुषांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे महत्त्व पटवून दिले.

मागील वर्षात युनियन बँक शाखा महागावमार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत अपघाती तसेच नैसर्गिक मृत्यू झालेल्या अनेक लाभार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा विमा लाभ देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विमा हा केवळ योजना नसून संकटकाळातील आर्थिक आधार असल्याचे रत्नपारखी यांनी स्पष्ट केले.

यावेळी शाखा व्यवस्थापक किरण सर यांनीही विमा हा प्रत्येकाच्या जीवनातील अत्यावश्यक घटक असल्याचे सांगत, “सामान्य असो वा उच्च जीवनमान असो, विमा ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमात “किंग ऑफ क्लेम सेटलमेंट” म्हणून ओळख असलेल्या दुधाडे सर यांचा विशेष गौरव करण्यात आला.तसेच शेतकरी मित्र आरडीओ सतीश कुबडे ,दिलीप शिरपाते यांनी कर्जविषयक विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल बीसी प्रतिनिधी दिलीप जाधव यांनी सर्व वरिष्ठ अधिकारी, बँक कर्मचारी तसेच परिसरात कॅम्प उभारण्यासाठी पुढाकार घेणारे गोपाल कासार यांचे आभार मानले. या शिबिरामुळे काळी परिसरात विमा व आर्थिक साक्षरतेबाबत सकारात्मक जनजागृती झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या