विदर्भस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ओजस्वी चौधरीची सुवर्ण कामगिरी महागावच्या कन्येने फडकावला यशाचा झेंडा; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
लोकवेध न्यूज नेटवर्क / १८ मे.
महागाव :-
महागाव नगरपंचायतीचे माजी नगरसेवक जयंत चौधरी यांची कन्या ओजस्वी जयंत चौधरी हिने हिंगणघाट,जिल्हा वर्धा येथे आयोजित विदर्भस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावून महागाव तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.तिच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्राची आवड असलेल्या ओजस्वीने कठोर मेहनत,नियमित सराव आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये तिने दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
ओजस्वीच्या या यशामुळे महागाव तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.तिच्या या यशामागे कुटुंबीयांचे प्रोत्साहन,प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची चिकाटी महत्त्वाची ठरल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
ओजस्वी चौधरी हिच्या पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत असून भविष्यात ती आणखी मोठे यश संपादन करेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

