महागाव नगरपंचायतीत पुन्हा रेकॉर्डचा घोळ  स्थायी समितीचे प्रोसिडिंग रजिस्टर बेपत्ता; घरकुल फाइलनंतर आता महत्त्वाच्या नोंदवहीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

महागाव नगरपंचायतीत पुन्हा रेकॉर्डचा घोळ 

लोकवेध न्यूज नेटवर्क | ०२ सप्टेंबर २०२६

महागाव :नगरपंचायतीतील प्रशासकीय कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्थायी समितीचे महत्त्वाचे प्रोसिडिंग रजिस्टर नगरपंचायत कार्यालयातून बेपत्ता झाल्याचे समोर आल्याने प्रशासनाच्या रेकॉर्ड व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पंतप्रधान आवास योजनेच्या २२ फाइली गायब झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर कथित देशी दारू भट्टीसाठी खोट्या सह्या करून एनओसी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा महत्त्वाचे रेकॉर्ड गायब झाल्याने नगरपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.

नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा सुरू असताना स्थायी समितीचे प्रोसिडिंग रजिस्टर मागविण्यात आले. मात्र, संबंधित रजिस्टर कार्यालयात उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कार्यालयीन स्तरावर शोध घेण्यात आला; परंतु रजिस्टर न सापडल्याने ते नेमके कुठे गेले, याचा तपास करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांनी रजिस्टर गायब झाल्याची माहिती मिळताच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित सभा लिपिकाची चौकशी करून आवश्यक असल्यास तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. संबंधित सभा लिपिकाने हे रजिस्टर एका नगरसेवकाला दिल्याचे सांगितल्याचा दावाही भरवाडे यांनी केला आहे. त्यामुळे रजिस्टर कोणाच्या ताब्यात होते, ते कार्यालयाबाहेर नेण्यात आले होते का आणि ते परत का आले नाही, याची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.
———————————–
विरोधी पक्षनेते शैलेश कोपरकर यांनीही रजिस्टर तातडीने शोधून काढण्याची मागणी केली असून सात दिवसांच्या आत रेकॉर्ड उपलब्ध न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.रजिस्टर गायब होण्याबाबत काही पदाधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यांनी आरोप केले असून, या आरोपांची अधिकृत चौकशी होणे बाकी आहे.
———————————–
नगराध्यक्ष सौ.रंजना आडे यांनीही सर्वसाधारण सभेदरम्यान रजिस्टर गायब असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विकास देशमुख यांच्याशी संपर्क साधून उचित कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.

स्थायी समितीच्या प्रोसिडिंग रजिस्टरमध्ये समितीचे ठराव, विकासकामांना दिलेल्या मंजुरी, विविध प्रस्ताव आणि महत्त्वाच्या निर्णयांची नोंद केली जाते. त्यामुळे हे रजिस्टर नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजातील महत्त्वाचे अधिकृत दस्तऐवज आहे. अशा रेकॉर्डची सुरक्षितता आणि जतन करण्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

रजिस्टर शेवटचे कोणाच्या ताब्यात होते ? ते कार्यालयात शेवटचे कधी पाहण्यात आले? कार्यालयाबाहेर नेण्यात आले असल्यास त्याची नोंद आहे का ? त्या कालावधीत कार्यालयात कोणकोणते अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ? कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही हालचाल आढळते का ? या सर्व बाबींची चौकशी होणे आवश्यक आहे.
———————————–
⬛ घरकुलाच्या फाइलनंतर आता रजिस्टर; रेकॉर्ड सुरक्षित तरी आहेत का ?

महागाव नगरपंचायतीत यापूर्वी घरकुलाच्या फाइली गायब होण्याचे प्रकरण चर्चेत आले. त्यानंतर एनओसी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप झाले आणि आता स्थायी समितीचे महत्त्वाचे रजिस्टर बेपत्ता झाल्याने प्रशासनाच्या रेकॉर्ड व्यवस्थापनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नगरपंचायतीचे महत्त्वाचे दस्तऐवज वारंवार गायब होण्याची वेळ का येते ? रेकॉर्डची जबाबदारी नेमकी कोणाची ? आणि या प्रकारामागे नेमके कारण काय ? या प्रश्नांची उत्तरे निष्पक्ष चौकशीतून समोर येणे आवश्यक आहे.
———————————–
⬛ जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

महत्त्वाचे अधिकृत रेकॉर्ड बेपत्ता होणे ही गंभीर प्रशासकीय बाब आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, रजिस्टर शोधून काढावे आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या