महागाव तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे. अंगणवाडी मदतनीस पदावर निवड करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अतिरिक्त कार्यभारावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी (वर्ग-३) शंकुतला जयवंत इंगोले (वय ५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) यवतमाळ पथकाने ५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना काल दिनांक २२ जुलै रोजी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास रंगेहात ताब्यात घेतले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय महिला उमेदवाराने अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला होता. निवड करून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत उमेदवाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. दरम्यान २२ जुलै रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपीने १० हजार रुपयांपैकी प्रथम ५ हजार रुपये स्वीकारण्यास, तर उर्वरित रक्कम नंतर घेण्यास संमती दिल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर एसीबीने सापळा रचला.
महागाव येथील आरोपीच्या राहत्या घरी तक्रारदारास पंचांसमक्ष पाठविण्यात आले.स्वयंपाकघरात आरोपीने ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने धाड टाकून तिला रंगेहात ताब्यात घेतले.या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम,१९८८ (सुधारित २०१८) च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.दरम्यान आरोपीच्या राहत्या घराची झाडाझडतीही घेण्यात आली असून ही,कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर,अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर,पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस निरीक्षक मनोज ओरके तसेच एसीबीच्या पथकाने केली.
———————————————————————-
एसीबीने नागरिकांना आवाहन केले.
कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ तक्रार करावी.तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवून कायदेशीर कारवाई केली जाईल.