महिला शिक्षिकेच्या कथित छळाविरोधात बजरंग दल आक्रमक; पत्रकाराविरुद्ध FIRची मागणी २४ तासांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा; एप्रिलमधील पोलीस ठाण्याच्या CCTV फुटेजची चौकशी करण्याची मागणी
महिला शिक्षिकेच्या कथित छळाविरोधात बजरंग दल आक्रमक; पत्रकाराविरुद्ध FIRची मागणी २४ तासांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा; एप्रिलमधील पोलीस ठाण्याच्या CCTV फुटेजची चौकशी करण्याची मागणी
महागाव तालुक्यातील जनुना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत महिला शिक्षिकेचा कथित मानसिक छळ, धमकी, ब्लॅकमेलिंग तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या महागाव तालुका शाखेने महागाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित शेख शब्बीर शेख भिक्कन यांच्याविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रार अर्जानुसार, संबंधित व्यक्ती स्वतःला पत्रकार असल्याचे सांगून जनुना येथील जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करत असल्याचा आरोप आहे. महिला शिक्षिकेवर उशिरा येणे, पोषण आहारातील कथित गैरप्रकार आदींबाबत आरोप करून बातमी प्रसिद्ध करण्याची तसेच नोकरीवर परिणाम करण्याची धमकी दिल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या प्रकारामुळे शाळेतील वातावरणावर परिणाम होत असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
एप्रिल २०२६ मध्ये संबंधित महिला शिक्षिकेने महागाव पोलीस ठाण्यात दोन वेळा तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या तक्रारींची नोंद झाली नसल्याचा आरोप अर्जातून करण्यात आला आहे. तसेच, तक्रार केल्यास त्यांच्या पतीविरुद्ध खोटा छेडखानीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही तक्रारदारांनी केला आहे.
सततच्या कथित त्रासामुळे महिला शिक्षिकेने आपली बदली आमणी येथे करून घेतल्याचेही तक्रार अर्जात म्हटले आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या त्या अद्याप जनुना येथील शाळेशी संबंधित असल्याने दहशतीच्या वातावरणात कर्तव्य बजावावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
एप्रिलमधील CCTV फुटेज तपासण्याची मागणी
या प्रकरणातील आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी एप्रिल २०२६ मधील महागाव पोलीस ठाण्याचे CCTV फुटेज तातडीने जप्त करून तपासण्यात यावे, अशी प्रमुख मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केली आहे. महिला शिक्षिकेने तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात भेट दिली होती का, त्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती आणि तक्रार नोंदवण्यात आली नसल्यास त्यामागील कारण काय होते, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदारांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध धमकी, महिला छळ, शासकीय कामात अडथळा व इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पीडित महिला शिक्षिका आणि त्यांच्या कुटुंबाला आवश्यक पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
२४ तासांचा अल्टिमेटम
या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन २४ तासांच्या आत कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई न झाल्यास महागाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून तालुकाभर आंदोलन करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने दिला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या तक्रारीच्या प्रती पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडेही पाठविण्यात आल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे.