दहीहंडीतील भाषणानंतर गुन्हा; हर्षा ठाकूर यांच्यावरील कारवाई रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदन; उमरखेडमधील दहीहंडी उत्सवातील भाषणाचा संदर्भ देत सखोल चौकशीची ही मागणी
दहीहंडीतील भाषणानंतर गुन्हा; हर्षा ठाकूर यांच्यावरील कारवाई रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदन; उमरखेडमधील दहीहंडी उत्सवातील भाषणाचा संदर्भ देत सखोल चौकशीची ही मागणी
उमरखेड शहरातील दहीहंडी उत्सवात प्रमुख वक्त्या म्हणून सहभागी झालेल्या हर्षा ठाकूर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उमरखेड शहरातील दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हर्षा ठाकूर यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या भाषणानंतर काही व्यक्तींनी आक्षेप घेतल्याने उमरखेड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, ठाकूर यांच्या भाषणाचा उद्देश कोणत्याही समाजाविरोधात द्वेष निर्माण करणे हा नव्हता. हिंदू संस्कृती, धर्म आणि सणांचे महत्त्व तसेच दहीहंडी उत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेबाबत त्यांनी विचार मांडल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १९६(१), २९९ आणि ३५३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचा उल्लेख निवेदनात आहे.या कारवाईमुळे उमरखेडमधील हिंदू समाजात नाराजी निर्माण झाल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
हर्षा ठाकूर या राष्ट्रवादी विचारांच्या वक्त्या असून त्यांनी यापूर्वी विविध ठिकाणी कायद्याच्या चौकटीत राहून आपले विचार मांडल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थितीच्या आधारे त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश द्यावेत,अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर खरेदी-विक्री संघ संस्थेचे अध्यक्ष सुदर्शन रावते पाटील, ॲड. अनिल माने,उमरखेड नगरपरिषदेचे भाजपा गटनेते विजय हरडपकर, नगरसेवक गोपाल कलाने, लक्ष्मीकांत मेंड, भास्कर साधू, ॲड. विजय गुजरे, अमोल तिवरंगकर आणि पुंडलिक कुबडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात स्व. प्रमोद महाजन चॅरिटेबल ट्रस्ट, स्वतंत्र सैनिक स्व. व्यंकटलालजी भुतडा बहुउद्देशीय संस्था तसेच नितीन भुतडा मित्र परिवार, उमरखेड यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.