पुसद शहरात नागरिकांना लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या तसेच शेतकऱ्यांच्या मोटार पंपाच्या केबल चोरीच्या मालिकेला अखेर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यवतमाळने पूर्णविराम दिला आहे.एलसीबीच्या धडाकेबाज कारवाईत दोन जबरी चोरी आणि शेतीविषयक सहा चोरी असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले असून, एका सराईत आरोपीसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.या कारवाईत सुमारे १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी पुसद बसस्थानक परिसरात अरविंद दारासिंग चव्हाण यांना धक्का देत त्यांच्या हातातील मोबाईल आणि ३७ हजार रुपयांची रोकड हिसकावून नेण्यात आली होती. तर वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण श्रावण राठोड यांना कमी पैशांत पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये बसवून देण्याचे आमिष दाखवत निर्जनस्थळी नेऊन त्यांच्याकडील ५ हजार रुपयांची रोकड आणि दोन चांदीच्या अंगठ्या जबरीने लुटण्यात आल्या होत्या. या दोन्ही प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुन्ह्यांचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अयाज अहमद एजाज अहमद (वय ३२, रा. मधुकर नगर, पुसद) व त्याच्या विधीसंघर्षग्रस्त साथीदाराचा शोध घेण्यात आला. बरखा टॉकीज परिसरातून दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी दोन्ही जबरी चोरीचे गुन्हे कबूल केले.
झडतीदरम्यान आरोपींकडून जबरी चोरीतील मोबाईल, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, आरोपीचा मोबाईल तसेच ८ किलो ५०० ग्रॅम कॉपर वायर जप्त करण्यात आली. कॉपर वायरबाबत चौकशी केली असता पुसद ग्रामीण, खंडाळा, वसंतनगर आणि महागाव परिसरातील शेतांमधून मोटार पंपाच्या केबल चोरीचे आणखी सहा गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली.
या कारवाईमुळे दोन जबरी चोरी व सहा शेतीविषयक चोरी असे एकूण आठ गुन्ह्यांची उकल झाली असून, जप्त मुद्देमालासह आरोपींना पुढील तपासासाठी पुसद शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही,उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात,उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहीते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे, पुसद शहरचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहीरकर आणि वसंतनगरचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड करीत आहेत.