महागाव तालुक्यातील काळी (दो) शिवारात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या निलगाय शिकारीच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, स्थानिक गुन्हे शाखेने अवैध देशी बनावटीच्या बंदुकीसह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वन्यजीव शिकारीविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणारे तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रविवारी पुसद उपविभागात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार काळी (दो) परिसरात सापळा रचून संशयितावर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी सय्यद कलीम उर्फ काळ्या सय्यद हाफिज (वय ३२, रा. काळी दो, ता. महागाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीची अवैध बंदूक जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या साथीदारासह मार्च महिन्यात पांढरकवडा-इंजनी शेतशिवारात निलगायची शिकार केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी यापूर्वीच भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता नव्याने झालेल्या तपासात आरोपीची भूमिका स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अन्वयेही गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचूक माहिती व नियोजनाच्या जोरावर ही कारवाई यशस्वी केली.
वन्यजीवांची अवैध शिकार आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून,अशा गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मार्च महिन्यातील निलगाय शिकारीचा गुन्हा उघड झाल्याने वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या यंत्रणांनाही मोठे यश मिळाले आहे.