महागाव शहरातील अवैध देशी दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी सोमवारी दिनांक ८ जून रोजी सकाळी धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली. तहसील कार्यालयाच्या भिंतीलगत असलेल्या पानटपरीत सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीच्या ठिकाणासह इतर काही ठिकाणांवर छापे टाकून दारूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बेकायदा व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.
प्राप्त माहितीनुसार,तहसील कार्यालयाच्या भिंतीलगत मागील दोन वर्षांपासून अवैध देशी दारू विक्री सुरू होती. याबाबत वेळोवेळी तक्रारी आणि वृत्तप्रसिद्धी होत असतानाही कारवाई केवळ कागदोपत्री होत असल्याची चर्चा होती. कारवाईनंतर काही दिवस परिस्थिती बदलत असे; मात्र नंतर पुन्हा सर्व काही पूर्ववत होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात होता.
दरम्यान, ठाणेदार धनराज निळे यांच्या बदलीनंतर प्रभारी ठाणेदार सुनील अंभोरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध दारूविक्रीविरोधात मोहीम उघडली. रविवारी सकाळपासून पोलिस पथकाने शहरातील विविध ठिकाणी धाडसत्र राबवून अवैध दारू विक्रेत्यांचा गाशा गुंडाळला.
मात्र, या कारवाईनंतरही शहर व तालुक्यात सुरू असलेल्या वरळी मटका अड्ड्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. “दारू विक्रीवर हातोडा पडला, पण मटका अड्ड्यांवर कारवाई कधी?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.
याशिवाय काही हॉटेल परिसरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या बेकायदा धंद्यांबाबतही पोलिस प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे नव्याने येणाऱ्या ठाणेदारांसमोर अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे मुडाना येथील गाजलेल्या पल्लवी भुतेकर हत्याकांडातील दोन आरोपी अजूनही फरार असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक कधी होणार, असा प्रश्नही नातलगांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे.
———————————————————————-
अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांनी घातलेला आळा स्वागतार्ह असला, तरी वरळी मटका व इतर बेकायदा धंद्यांवरही तितक्याच कठोरपणे कारवाई व्हावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. महागावातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि निष्पक्ष कारवाईची अपेक्षा आहे.