जनावर तस्करीचा पाठलाग करणाऱ्या तरुणाचा दगडफेकीत मृत्यू;  पोलिसांच्या निष्क्रियतेवर संतप्त सवाल ? नाकाबंदीचा फज्जा ..

 लोकवेध न्यूज नेटवर्क / २४ मे.

 

महागाव :-

 

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध जनावर वाहतुकीकडे पोलिसांनी केलेल्या कथित दुर्लक्षाचे भीषण परिणाम शनिवारी मध्यरात्री महागाव–उमरखेड मार्गावर पाहायला मिळाले.जनावर तस्करीचा संशय असलेल्या पिकअप वाहनाचा पाठलाग करणाऱ्या एका तरुणाचा दगडफेकीत मृत्यू झाल्याने सुकळी परिसर हादरला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

 

प्राप्त माहितीनुसार, एमएच २९ बीई ८९१५ क्रमांकाच्या पिकअप वाहनातून १५ ते १६ जनावरे कोंबून अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती काही बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली होती.संबंधित वाहन आर्णी–महागाव मार्गे बिजोरा टोलनाका ओलांडून उमरखेडच्या दिशेने जात असल्याचे समजताच काही कार्यकर्त्यांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला.

दरम्यान, वाहनचालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत महागाव–बिजोरा मार्ग पार केला आणि पुढे सुकळी गावाजवळील एका मोकळ्या जागेत पिकअप थांबवून पाठलाग करणाऱ्यांवर अचानक दगडफेक सुरू केली.या घटनेचे काही व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

या,हल्ल्यात गजानन मारुती सुरोशे यांच्या एमएच १२ पीटी ८६३४ क्रमांकाच्या एस-क्रॉस वाहनाचे मोठे नुकसान झाले.गंभीर जखमी झालेल्या सुरोशे यांना तातडीने नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.घटनेनंतर महागाव तालुक्यातील वडदसह अनेक गावांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून रविवारी काही भागांमध्ये बंद पाळण्यात आल्याची माहिती आहे. सुकळी परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेतली. उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास सुरू केला असून आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध जनावर वाहतूक रोखण्यासाठी नाकाबंदी आणि तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश असल्याची चर्चा असतानाही प्रत्यक्षात तालुक्यात प्रभावी तपासणी नाकाबंदी दिसून आली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.राष्ट्रीय महामार्गावरील धनोडा, भोसा, महागाव – कलगाव टी पॉइंट परिसरात सुरुवातीपासूनच कडक नाकाबंदी उभारली असती,तर संशयित वाहन अडविणे शक्य झाले असते.परंतु महागाव पोलिसांचे दुर्लक्षित धोरणं एका निष्पाप व्यक्तीचे मरण बनले आहे.त्यामुळे तालुक्यासह शहरातील नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या