रोपवन जळीत प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात; प्रकरणाचा निपटारा झाल्याशिवाय अधिकाऱ्याला कार्यमुक्त करू नका ,नितीन भुतडा

लोकवेध न्यूज नेटवर्क / १७ मे.

 

महागाव :- 

 

महागाव तालुक्यातील काळी (दौ.) वनपरिक्षेत्रात घडलेल्या रोपवन जळीत आणि नीलगाय शिकार प्रकरणामुळे वनविभाग अडचणीत सापडला असून, हे संपूर्ण प्रकरण आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपळगाव–सारकिनी परिसरातील कक्ष क्रमांक ८१३ मधील कॅम्पा योजनेअंतर्गत असलेल्या रोपवन क्षेत्रातील सुमारे अडीच हेक्टरवरील वृक्षलागवड काही दिवसांपूर्वी आगीत जळून खाक झाली होती.मात्र,घटनेला जवळपास महिना उलटूनही संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडून अधिकृत अहवाल सादर करण्यात आलेला नसल्याने संशय अधिकच वाढला आहे.

ही आग नैसर्गिक नसून काही गैरप्रकार झाकण्यासाठी मुद्दाम लावण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान,दि. १० मार्च २०२६ रोजी पोखरी शिवारात नीलगाय शिकारीचा प्रकारही उघडकीस आला होता. यापूर्वीही वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडूनही संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे वन्यजीव संरक्षणाबाबत वनविभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या सर्व घटनांची गंभीर दखल घेत सहायक उपवनसंरक्षक शशांक कदम यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. मात्र, महिनाभर उलटूनही अहवाल प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे पुसद जिल्हा चिटणीस सुनिल रामभाऊ टेमकर यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदन देत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे,अशी मागणी त्यांनी केली आहे.

———————————————————————-

 

दरम्यान, भाजपचे समन्वयक तथा अकोला जिल्हा प्रभारी नितीन भुतडा यांनीही या प्रकरणात तीव्र भूमिका घेतली आहे.रोपवन जळीत प्रकरणाचा पूर्ण निपटारा झाल्याशिवाय संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करू नये,अशी मागणी  वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना त्यांनी केली आहे.

 

———————————————————————

वन अधिनियमानुसार एक वृक्ष तोडल्यास दुसरे वृक्ष लावून त्यांचे संगोपन करणे बंधनकारक असते. मात्र येथे शेकडो रोपे आगीत नष्ट झाली असून, जंगलातील अनेक लहान जीव-जंतू व सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.वनविभागाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे काळी दौलत वनपरिक्षेत्रातील हे प्रकरण आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या