चक्रीवादळाने केळी उत्पादकांना दिला जबरदस्त फटका; नुकसानभरपाईचे निकष बदलण्याची शेतकरी नेत्यांची मागणी अंबोडा येथे गजानन तायडे यांच्या शेतातील केळी पीक जमीनदोस्त; शासनाने भरीव मदत करावी – गोविंदराव देशमुख
चक्रीवादळाने केळी उत्पादकांना दिला जबरदस्त फटका; नुकसानभरपाईचे निकष बदलण्याची शेतकरी नेत्यांची मागणी अंबोडा येथे गजानन तायडे यांच्या शेतातील केळी पीक जमीनदोस्त; शासनाने भरीव मदत करावी – गोविंदराव देशमुख
महागाव तालुक्यात मागील दोन दिवसांपासून आलेल्या चक्रीवादळाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. सवना, वाकोडी, अंबोडा, खडका आणि कंरजी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे लाखो रुपयांच्या केळी पिकांचे नुकसान झाले असून अनेक शेतांतील बहारात आलेली केळी जमीनदोस्त झाली आहेत.
अंबोडा येथील शेतकरी गजानन तायडे यांच्या शेतातील केळी पीक पूर्णपणे आडवे पडले असून हाती आलेले उत्पादन अक्षरशः मातीमोल झाले आहे. एका एकरासाठी सुमारे एक लाख रुपयांपर्यंत खर्च करून उभे केलेले पीक काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पंचनामे सुरू केले असले तरी सध्याच्या नुकसानभरपाईच्या निकषांबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर पंचनामे होतात, मात्र मिळणारी मदत प्रत्यक्ष उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
याबाबत प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते गोविंदराव देशमुख (सवनेकर) म्हणाले, निसर्ग शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडत आहे. शंभर टक्के नुकसान झाले तरी खर्चाच्या पंचवीस टक्केही भरपाई मिळत नाही. शासनाने मदतीचे निकष बदलून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी. किमान पुढील पीक घेण्याची क्षमता निर्माण होईल इतकी मदत मिळणे आवश्यक आहे. अन्यथा केळीसारखी फळपिके घेण्यास शेतकरी धजावणार नाहीत.
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन शासनाने विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे आणि गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी नुकसानभरपाई धोरणात बदल करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.