महागाव तालुक्यातील उटी येथील प्रयोगशील शेतकरी विनोद मैंद यांच्या कृषी क्षेत्रातील संशोधन, नावीन्यपूर्ण प्रयोग आणि शेतकरीहिताच्या कार्याची राज्य शासनाने दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा ‘शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार – २०२३’ प्रदान करून गौरविण्यात आले. नुकत्याच चार दिवसांपूर्वी मुंबईच्या वरळी येथील लोटस डोम येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल,फलोत्पादन मंत्री भारत गोगावले,मंत्री इंद्रनील नाईक, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी सचिव परिमल सिंह तसेच विस्तार संचालक रफिक नाईकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
विनोद मैंद यांनी निवड पद्धतीद्वारे सोयाबीनच्या दोन, हरभऱ्याच्या चार आणि तुरीच्या एका सुधारित वाणाची निर्मिती करून कृषी संशोधन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी विकसित केलेल्या तुरीच्या वाणाला ‘शिवनेरी-४५’ असे नाव दिले असून, हे वाण अधिक उत्पादनक्षम असल्याचा त्यांचा दावा आहे. या वाणाच्या बियाण्यांना राज्यभरातील शेतकऱ्यांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे.
वाण निर्मितीबरोबरच आधुनिक पीक लागवड पद्धती,उत्पादनवाढ आणि कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयोग केले आहेत. त्यांच्या संशोधनप्रधान कार्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा नवा मार्ग मिळाला असून,कृषी क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र आणि प्रेरणादायी स्थान निर्माण केले आहे.
राज्य शासनाकडून प्राप्त झालेला ‘शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ हा त्यांच्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रम, संशोधनवृत्ती आणि शेती विकासासाठीच्या समर्पित कार्याचा गौरव मानला जात असून,महागाव तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यासाठीही ही अभिमानाची बाब ठरत आहे.