राज्याचा प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ विनोद मैंद यांना जाहीर ; जिद्द, मेहनत आणि आधुनिक शेतीच्या जोरावर राज्यभरात उमटवला ठसा; अनेक शेतकऱ्यांसाठी ठरले प्रेरणास्थान
राज्याचा प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ विनोद मैंद यांना जाहीर ; जिद्द, मेहनत आणि आधुनिक शेतीच्या जोरावर राज्यभरात उमटवला ठसा; अनेक शेतकऱ्यांसाठी ठरले प्रेरणास्थान
महागाव तालुक्यातील उटी येथील प्रगतशील शेतकरी विनोद रंगराव मैंद यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर राज्याच्या कृषी क्षेत्रात मानाचे स्थान मिळविले आहे.महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या सन २०२३ च्या राज्य कृषी पुरस्कारांमध्ये त्यांची ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे उटी गावासह संपूर्ण महागाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
साधी राहणी, शेतीप्रती अपार प्रेम आणि सतत काहीतरी नवीन करण्याची जिद्द या बळावर विनोद मैंद यांनी शेतीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी शेतीकडे केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर समाजासाठी प्रेरणा देणारे कार्य म्हणून पाहिले. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांचा राज्यस्तरीय सन्मान जाहीर केला आहे.
राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, संस्था आणि कृषी अधिकाऱ्यांना दरवर्षी विविध कृषी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये विनोद मैंद यांची निवड झाल्याने महागाव तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
विनोद मैंद यांचा हा सन्मान केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नसून, तो ग्रामीण भागातील प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याच्या मेहनतीचा सन्मान आहे. शेतीमध्ये नवीन प्रयोग करत राहिल्यास आणि चिकाटीने काम केल्यास यश मिळते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखविले आहे.
आज अनेक तरुण शेतीपासून दूर जात असताना, विनोद मैंद यांची यशोगाथा नव्या पिढीला शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देणारी आहे.कष्टाला पर्याय नाही आणि जिद्दीसमोर कोणतीही अडचण मोठी नसते,हा संदेश त्यांच्या यशातून ग्रामीण भागातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे.
महागाव तालुक्याच्या मातीतून उगवलेला हा यशाचा दीप आता राज्यभरातील शेतकऱ्यांना नवी दिशा आणि नवी उमेद देत आहे.