शेतकऱ्यांच्या हक्काच्या वाटा झाल्या खुल्या ! महागावात दीड वर्षात १५० पांदण रस्ते मोकळे

लोकवेध न्यूज नेटवर्क / २१ जून.

 

महागाव :- 

 

महागाव तालुक्यात वर्षानुवर्षे अतिक्रमण, वाद आणि प्रशासकीय गुंतागुंतीमुळे बंद झालेल्या पांदण वाटा आता पुन्हा खुल्या होत असून, महसूल प्रशासनाच्या विशेष मोहिमेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंतचा हक्काचा मार्ग मिळाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘शेतरस्ता मोकळा’ अभियानाला गती देत तहसीलदार अभय मस्के यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षात तब्बल १५० पांदण रस्ते मोकळे करण्यात महसूल विभागाला यश आले आहे.

तालुक्यातील हिवरा, गुंज, फुलसावंगी, मोरथ, कासोळा, काळी दौलत आणि महागाव या सातही महसूल मंडळांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे बंद असलेले शेतरस्ते, अतिक्रमणामुळे निर्माण झालेले वाद तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत महसूल विभागाने प्राधान्याने कारवाई केली. प्रत्यक्ष पाहणी, सुनावण्या आणि समन्वयाच्या माध्यमातून अनेक गुंतागुंतीची प्रकरणे मार्गी लावण्यात आली.

या मोहिमेमुळे हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंतचा हक्काचा मार्ग पुन्हा उपलब्ध झाला आहे. पूर्वी शेतात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागणारे किंवा शेजारील शेतातून जावे लागणारे अनेक शेतकरी आता थेट आपल्या जमिनीपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे शेतीची मशागत, पेरणी, कापणी तसेच शेतमाल वाहतुकीची कामे अधिक सुलभ झाली आहेत.

विशेष म्हणजे, शेतरस्त्यांच्या प्रश्नांसोबतच महसूल विभागातील अनेक जुनी आणि प्रलंबित प्रकरणेही या काळात निकाली काढण्यात आली आहेत. सीमांकन, फेरफार, वारसा हक्क, अतिक्रमण आणि इतर महसुली विषयांशी संबंधित प्रकरणांच्या निपटाऱ्यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.प्रशासन लोकांच्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न महसूल विभागाने केल्याचे चित्र या मोहिमेतून दिसून येत आहे.

राज्यभर सुरू असलेल्या ‘शेतरस्ता मोकळा’ अभियानाला महागाव तालुक्यात मिळालेले हे यश विशेष मानले जात आहे. १५० पांदण रस्ते मोकळे करण्याची कामगिरी ही केवळ आकड्यांची नोंद नसून, शेतकऱ्यांच्या हक्काच्या वाटा पुन्हा खुल्या झाल्याची विशेष नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या