मुडाणा येथे आत्मा अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रम उत्साहात; कापूस लागवड, पीक विमा व हवामान बदलावर मार्गदर्शन

लोकवेध न्यूज नेटवर्क / १५ जून.

 

महागाव :- 

 

महागाव तालुक्यातील मुडाणा येथे कृषी विभागाच्या आत्मा (ATMA) अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना कापूस लागवड तंत्रज्ञान, पीक विमा, हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती तसेच विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे प्रगतशील शेतकरी सदानंद पाटील हे होते.तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान, कापूस उत्पादन वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. कपास क्रांती योजनेंतर्गत अधिक घनता कापूस लागवडीसाठी महाडीबीटी प्रणालीवर शेतकरी गटांनी अर्ज करावेत,असे आवाहन त्यांनी केले. तसेच यावर्षी सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. फळबाग लागवड आणि शेतकरी गट लीग स्पर्धेबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

उपविभागीय कृषी अधिकारी श्री. विजय मुकाडे यांनी एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना, हवामान अनुकूल कृषी पद्धती आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या शेती व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती दिली.

 

सहाय्यक कृषी अधिकारी श्री. मुळे यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना तसेच महाडीबीटीवरील विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रे.) येथील विषय विशेषज्ञ श्री. अक्षय इंझाळकर यांनी खरीप हंगामातील कापूस, तूर आणि सोयाबीन या प्रमुख पिकांच्या लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.

 

सहाय्यक कृषी अधिकारी श्री. हटकर यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेची माहिती दिली, तर सहाय्यक कृषी अधिकारी श्री. पांडुरंग बैनवाड यांनी हुमणी अळी नियंत्रण व महाविस्तार एआय अॅपच्या वापराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

बी.टी.एम. अविनाश वाघमारे यांनी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेण्याची शास्त्रोक्त पद्धत स्पष्ट केली. यावेळी बांधावरील लॅबचे संचालक देवानंद भाऊ यांच्या माध्यमातून माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच जैविक निविष्ठांचे उत्पादन व वापर करून शेतीचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) विषयी माहिती दिली. प्रगतशील शेतकरी तथा गोल्ड ग्राम शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष दुलाजी भिमटे यांनी शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनीचे महत्त्व विशद केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कृषी अधिकारी निमलवाड,भांडवले (समूह सहाय्यक) तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोकरा अंतर्गत समूह सहाय्यक नितीन वाहुळे यांनी केले.

यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापक व संचालक संजय बरडे, नैसर्गिक शेतीमधील कृषी सखी, शेतकरी गटातील सदस्य तसेच गावातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती मिळाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या