पावसाअभावी ऊस पिकाच्या शेवटच्या घटका; उत्पादन घटीच्या भीतीने ऊस उत्पादक धास्तावले; मृग नक्षत्र संपत आले तरी पावसाचा पत्ता नाही; पुसद, महागाव व उमरखेड तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद

लोकवेध न्यूज नेटवर्क / २१ जून.

महागाव :- 

मृग नक्षत्र संपत आले असूनही अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने विदर्भासह राज्यातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्त्रोत कोरडे पडत असल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका ऊस या नगदी पिकाला बसत असून पुसद, महागाव आणि उमरखेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

विदर्भातील साखरपट्टा म्हणून नव्याने ओळख निर्माण झालेल्या या भागात हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण ऊस पिकावर अवलंबून आहे. मात्र मागील वर्षी अतिवृष्टी आणि ऊशिरा झालेल्या गाळपामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यातच यंदा पावसाने दडी मारल्याने ऊस पिकाला पाण्याचा पुरवठा होत नसून अनेक ठिकाणी ऊस करपू लागला आहे.

एका भेटी दरम्यान शेतकरी मित्र गोविंदराव देशमुख सवनेकर यांनी सांगितले की,सध्याच्या परिस्थितीत ऊस पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.आजच्या घडीला एकरी दहा ते पंधरा टनांपर्यंत उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.”

हवामान विभागानेही यंदा काही भागांत कमी पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शासनाकडून संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन विविध उपाययोजनांचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी पूर्वीच्या दुष्काळी अनुभवामुळे शेतकऱ्यांमध्ये साशंकता कायम आहे.

दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप किंवा कोरोना यांसारख्या संकटांच्या काळात सर्वसामान्य शेतकरी आणि शेतमजूर यांनाच सर्वाधिक फटका बसतो, असा अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आजपासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि संभाव्य संकटासाठी सज्ज राहणे गरजेचे असल्याचे आवाहन गोविंदराव देशमुख सवनेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या