महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे पावसाळ्यात वाढणाऱ्या लंपी (Lumpy Skin Disease) या विषाणूजन्य संसर्गजन्य रोगाविरुद्ध प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला मंगळवारी उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेचा शुभारंभ शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
पावसाळ्यात डासांच्या माध्यमातून लंपी रोगाचा संसर्ग वेगाने पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून वागद इजारा ग्रामपंचायत परिसरात गुरा-जनावरांच्या लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
पशुचिकित्सालय, काळी दौलतखान येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. रुपेश नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण करण्यात आले.
यावेळी पशुधनांमध्ये होणारे विविध संसर्गजन्य आजार,त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, घ्यावयाची काळजी आणि आवश्यक दक्षता याबाबत पशुपालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जनावरांसाठी जंतनाशक गोळ्यांचेही वाटप करण्यात आले.यावेळी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी महागाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन करत, “लंपीसारख्या गंभीर विषाणूजन्य आजारापासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक पशुपालकाने आपल्या गुरा-जनावरांचे वेळेत लसीकरण करून घ्यावे,” असे सांगितले.
या कार्यक्रमाला भिकन सिताराम राठोड, सुभाष जाधव,डॉ. करण चव्हाण, डॉ. गोपाल राठोड यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने पशुपालक व शेतकरी उपस्थित होते.