नैसर्गिक साखर युनिट-२ मध्ये गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न यंदा ७.५० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात गळीत हंगाम सुरू होणार
नैसर्गिक साखर युनिट-२ मध्ये गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न यंदा ७.५० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात गळीत हंगाम सुरू होणार
नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लि.च्या युनिट क्रमांक २ मधील ११व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवारी, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
मागील गळीत हंगामात सर्वाधिक ऊस तोडणी व वाहतूक करणारे कंत्राटदार श्री. सुदर्शन धोंडबाराव शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रूपाली शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच मा. कुपिलसाहेब , चेअरमन कृषी रत्न बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मा.पांडुरंगजी आवाड, संचालक, मा. श्रीपाद ठोंबरे, प्रवर्तक नॅचरल शुगर आणि मा. बाळासाहेब टेळे, एनएसआय मल्टी स्टेट संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान यावेळी ठोंबरे यांनी बोलतांना सांगितले की, सर्वांच्या सहकार्याने मागील वर्षी नॅचरल शुगरने विदर्भात उच्चांकी ५ लाख ५५ हजार मेट्रिक टन गाळप केले. मागील वर्षी गाळपास आलेल्या उसाला एफआरपीप्रमाणे दर शेतकऱ्यांना अदा करण्यात आला आहे.
यावर्षी शेतकऱ्यांनी कारखान्याकडे एकूण ९,९९४ हेक्टर क्षेत्रावरील ऊस नोंदविला असून, ७.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी कारखान्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही सक्षम तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली आहे. दररोज किमान ५,५०० मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.
कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम ऑक्टोबर २०२६च्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करावी, असे यावेळी आवाहन करण्यात आले.
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कारखान्याने सुधारित ऊस जातींची प्रमाणित रोपे तसेच नॅचरल ऑरगॅनिक फर्टिलायझर (सेंद्रिय खत) सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
दरम्यान, युनिट-२ येथे नव्याने कार्यान्वित झालेल्या बायो सीएनजी प्रकल्पाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला कारखाना परिसरातील मान्यवर, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सिताराम ठाकरे, माजी संचालक गोविंदराव शिंदे, वेणी, टिकराम कदम, कलगाव, देवीदास पाटील सारसकिन्ही, तानाजी जाधव, नानाराव पुंडे, सुनील भावनकर तसेच कारखाना परिसरातील शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.