पावसाने दडी मारल्याने महागाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये खरीप पिकांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शेतात उभे असलेले सोयाबीन आणि कपाशीचे पीक पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाच्या पथकाने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा करून पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
महागाव तालुक्यातील भोसा,अंबोडा, नांदगव्हाण यासह विविध गावांमध्ये प्रशासनाच्या पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांची वाढ, पावसाअभावी झालेली हानी तसेच पिकांची सद्यस्थिती याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.‘ट्रिगर वन’च्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या निकषांचा विचार करून पिकांच्या परिस्थितीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्यात आली.
या पाहणीदरम्यान अनेक शेतांमध्ये पिकांची वाढ खुंटलेली असून, पुरेशा पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. विशेषतः सोयाबीन आणि कपाशी या प्रमुख खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले.पिकांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची माहिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा वर्षभराच्या आर्थिक नियोजनाचा आधार असतो.मात्र पावसाने साथ सोडल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा संकट उभे ठाकले आहे. बियाणे, खते,मशागत आणि लागवडीवर केलेला खर्च वसूल होईल की नाही,याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.त्यामुळे प्रशासनाच्या या पाहणीमुळे प्रत्यक्ष परिस्थिती शासनाच्या निदर्शनास जाण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
या पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी राम मुळे,तहसीलदार अभय मस्के,तहसीलदार राजू सुरडकर, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले तसेच मंडळ अधिकारी मारुती एकुलवार सहभागी झाले होते. प्रशासनाने प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केल्याने पिकांच्या नुकसानीचे वास्तव समोर येण्यास मदत होणार आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.एकीकडे शेतात उभे पीक आणि दुसरीकडे वाढत चाललेले संकट,अशा दुहेरी कोंडीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे पाहणी अहवालाच्या आधारे शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.