खतासाठी आता रांग नाही, आधी FFFS ॲपवर बुकिंग ! महागाव तालुक्यात २५ सप्टेंबरपासून अनुदानित खत वितरणाची नवी डिजिटल व्यवस्था; मोबाईलवर साठा पाहून घरबसल्या करता येणार आगाऊ बुकिंग
खतासाठी आता रांग नाही, आधी FFFS ॲपवर बुकिंग ! महागाव तालुक्यात २५ सप्टेंबरपासून अनुदानित खत वितरणाची नवी डिजिटल व्यवस्था; मोबाईलवर साठा पाहून घरबसल्या करता येणार आगाऊ बुकिंग
अनुदानित खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना आता दुकानांवर जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. महागाव तालुक्यात २५ सप्टेंबर २०२६ पासून FFFS (Framework for Fertilizer Sale) ॲपच्या माध्यमातून अनुदानित खतासाठी आगाऊ बुकिंगची नवी डिजिटल व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना मोबाईलवरून उपलब्ध खताचा साठा पाहता येणार असून, आपल्या शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार आवश्यक खताचे बुकिंग करता येणार आहे.
FFFS ॲपवर संबंधित खत विक्रेत्यांकडे कोणते खत उपलब्ध आहे आणि त्याचा किती साठा आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे खतासाठी दुकान-दुकान फिरण्याची किंवा मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही. घरबसल्या बुकिंग केल्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून खत घेण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
ॲपवर बुकिंग केल्यानंतर पुढील दोन दिवसांच्या आत अर्थात T+2 कालावधीत शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील प्रतिनिधीने संबंधित दुकानातून बुक केलेले खत ताब्यात घेणे अपेक्षित आहे. बुकिंगनुसार खत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित विक्रेत्याची राहणार असून, खताची विक्री छापील MRP पेक्षा अधिक दराने करता येणार नाही.
दरम्यान, अनुदानित खतासोबत इतर कोणतेही टॉनिक, औषध किंवा कृषी निविष्ठा घेण्याची सक्ती करण्यास प्रतिबंध आहे. खत घेण्यासाठी अशा प्रकारची लिंकिंग किंवा अतिरिक्त खरेदीची सक्ती होत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
FFFS ॲप वापरताना अडचण आल्यास शेतकऱ्यांना कृषी सखी, कृषी मित्र, पोक्रा समूह सहाय्यक, आत्मा ATM/BTM, सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन घेता येणार आहे.
महागाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी अनुदानित खत खरेदीपूर्वी FFFS ॲपवर नोंदणी करून आवश्यक खताचे आगाऊ बुकिंग करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. खत वितरणात पारदर्शकता आणणे, शेतकऱ्यांचा वेळ वाचविणे आणि अनुदानित खताचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, हा या डिजिटल व्यवस्थेमागील प्रमुख उद्देश आहे.