अत्यल्प पाऊस आणि पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे पुसद व महागाव तालुक्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे.कापूस, सोयाबीनसह विविध पिकांची अवस्था बिकट झाली असून अनेक शेतशिवारांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.पिके हातातून जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या,पार्श्वभूमीवर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी गुरुवारी माळपठार परिसरातील महागाव व पुसद तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून थेट शेताच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती,पिकांची सद्यस्थिती आणि संभाव्य आर्थिक नुकसानीची माहिती जाणून घेतली.
दौऱ्याची सुरुवात सकाळी ११ वाजता यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीने झाली.जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती,पावसातील खंड आणि खरीप पिकांच्या सद्यस्थितीचा बैठकीत आढावा घेण्यात आला.यानंतर राज्यमंत्री नाईक यांनी महागाव तालुक्यातील कासोळा, कोनदरी व वाकान, तसेच पुसद तालुक्यातील लोहरा (ई.), सावरगाव (बं.) आणि माळआसोली या गावांना भेटी दिल्या.
कापूस, सोयाबीनची प्रत्यक्ष पाहणी
कोनदरी येथे विजय बाबुलाल राठोड यांच्या शेतातील कापूस, तर सुनील चंद्रभान राठोड यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची राज्यमंत्री नाईक यांनी पाहणी केली. वाकान येथे अरविंद पवार यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीचीही त्यांनी माहिती घेतली.
कासोळा, लोहरा (ई.), सावरगाव (बं.) आणि माळआसोली परिसरातील नुकसानग्रस्त शेतशिवाराची पाहणी करताना शेतकऱ्यांनी पावसाअभावी पिकांवर ओढवलेले संकट राज्यमंत्र्यांसमोर मांडले.पिकांना आवश्यक पाऊस न मिळाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश
पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर राज्यमंत्री नाईक यांनी नुकसानीचे वस्तुनिष्ठ आणि तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर मदत व दिलासा मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी सरपंच रवींद्र पवार, हंसराज मोरे, प्रा. नरेंद्र जाधव, अक्षय राठोड, जोगदे सर (पीए), बीडीओ, एसडीओ, सुभाष जाधव,रामभाऊ कोसलगे, नामदेव जाधव, विलास मनवर, पत्रकार रवी राठोड यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी,प्रशासकीय अधिकारी व विविध गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.
⬛ कोरडा दुष्काळ जाहीर करा’; सीमा राठोड यांची मागणी
दरम्यान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष सौ. सीमा सुनील राठोड यांनी पुसद-महागाव परिसरातील परिस्थिती पाहता तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतीची अक्षरशः उलंगवाडी झाली आहे.कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांसह सर्वच पिके उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून त्यांना उभारी देण्यासाठी शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात अशी कळकळीची मागणी सीमा राठोड यांनी केली.
आता पंचनामे किती वेगाने होतात आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून प्रत्यक्ष मदत कधी मिळते, याकडे पुसद-महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.