माकप-किसान सभा तहसील कार्यालयावर धडकणार! शेतकरी, कष्टकरी, महिला व सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी सोमवारी महामोर्चा

लोकवेध न्यूज नेटवर्क  /  २५ सप्टेंबर.

महागाव :- 

तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या गंभीर बनल्या असून, या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महागाव तालुका किसान सभा, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) संयुक्त विद्यमाने सोमवार, २८ सप्टेंबर रोजी महागाव तहसील कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे.

महागाव शहरातील प्रमुख मार्गावरून लाल निशाण हातात घेऊन तसेच महापुरुषांना अभिवादन करून हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चानंतर तहसीलदारांनी संबंधित सर्व विभागांच्या खातेप्रमुखांना प्रत्यक्ष उपस्थित करून आंदोलकांच्या मागण्यांवर स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी आयोजकांनी केली आहे.

⬛ शेतकऱ्यांच्या कर्जप्रश्नावर मागण्या

कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ओटीएस योजनेचा लाभ देण्यात यावा, कर्जमाफीतील मृत कर्जदारांच्या वारसांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सुलभरीत्या कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुष्काळी परिस्थितीत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तालुक्यातील नवतरुणांना मुद्रा कर्ज विनाअट मंजूर करावे, अशी मागणीही मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

 ⬛ लाडकी बहीण’च्या लाभासाठी महिलांचा प्रश्न

‘लाडकी बहीण’ योजनेतील ज्या लाभार्थी महिलांचे अनुदान बंद झाले आहे, त्यांचे अनुदान कोणतीही अट न लावता पूर्ववत सुरू करावे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून पात्र महिलांना लाभ द्यावा तसेच नव्याने पात्र ठरणाऱ्या महिलांचे अर्ज तातडीने स्वीकारावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

⬛ वीजप्रश्नावरही आंदोलनाची भूमिका

महावितरणच्या कारभाराबाबतही आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बंद करण्यात आलेल्या कृषी पंपांची वीज जोडणी तातडीने पूर्ववत करावी, ५.३ ही अन्यायकारक योजना रद्द करून पूर्वीप्रमाणे वीज जोडणी द्यावी, तसेच घरगुती आणि अन्य वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

⬛ रेशन, केरोसीन व पेन्शनचा प्रश्न ऐरणीवर 

गेल्या दोन वर्षांपासून नवीन रेशनकार्डधारकांना धान्याचा लाभ मिळालेला नसल्याचा आरोप करत त्यांना तातडीने धान्य वितरित करावे, तसेच केरोसीन परवानाधारकांचे प्रलंबित मानधन मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

श्रावणबाळ तसेच वयोवृद्ध निराधार योजनेचे पेन्शन दरमहा तीन हजार रुपये करावे आणि प्रलंबित पेन्शनची रक्कम तातडीने वितरित करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

 ⬛ नेत्यांच्या नेतृत्वात मोर्चा 

लढवय्ये नेते ॲड. कॉम्रेड डी. बी. नाईक आणि कॉम्रेड देविदास मोहकर यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.

मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कॉम्रेड पांडुरंग मुडे, कॉम्रेड दत्तराव खंदारे, कॉम्रेड गणेश तिघलवाड, कॉम्रेड दिलीप भिसे, कॉम्रेड बाळासाहेब रणमले, कॉम्रेड खलनाईक पवार, कॉम्रेड सुनील पवार, कॉम्रेड सचिन जाधव, कॉम्रेड दयाराम जाधव, कॉम्रेड विठ्ठल घावस, प्रा. शरदचंद्र डोंगरे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी होणाऱ्या या महामोर्चाकडे आता प्रशासनाची भूमिका काय राहते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या