ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नेचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. युनिट क्रमांक २, गुंज-सवना या कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपासाठी आलेल्या ऊसाला एफआरपीनुसार प्रतिटन २,९१३ रुपये अंतिम दर देण्याचा निर्णय घेतला असून, हा दर विदर्भातील सर्वाधिक असल्याचा दावा कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केला आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीच शेतकऱ्यांना प्रतिटन २,७०० रुपये पहिला हप्ता गाळपानंतर अवघ्या १४ दिवसांत अदा करण्यात आला होता. आता उर्वरित २१३ रुपये प्रतिटन अंतिम हप्ता म्हणून देण्यात येणार असून, त्याचे धनादेश १५ जून २०२६ पासून शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत.
याबाबत माहिती देताना अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले की, नॅचरल उद्योग समूहाने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. विदर्भातील ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याची परंपरा कायम ठेवत शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
ते पुढे म्हणाले की, यंदाच्या हंगामात पावसाचे प्रमाण समाधानकारक नसतानाही शेतकऱ्यांनी मेहनतीने ऊस पीक उभे केले. अशा परिस्थितीत खत व्यवस्थापन, मशागतीचा खर्च आणि खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने अंतिम हप्ता तातडीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने तब्बल ५.५५ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून, त्यासाठी प्रतिटन २,९१३ रुपये अंतिम दर निश्चित करण्यात आला आहे. हा दर विदर्भातील सर्वाधिक असल्याचे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने २०२६-२७ हंगामासाठी ऊसाचा एफआरपी वाढवून ३६५ रुपये प्रति क्विंटल केला असून, ऊस उत्पादकांच्या उत्पन्नवाढीसाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.ऊसाला चांगला भाव, वेळेवर हप्ता आणि शेतकरी हिताचा विचार यामुळे नेचरल शुगरच्या निर्णयाचे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे.