खत विक्रीतील गैरप्रकारांवर कृषी विभागाचा मोठा दणका ! महागाव तालुक्यातील सहा कृषी केंद्रांच्या परवाना रद्दचा प्रस्ताव जिल्हास्तरावर; नियम धाब्यावर बसविणाऱ्यांमध्ये खळबळ

 लोकवेध न्यूज नेटवर्क / २५ मे.

 

 महागाव :- 

 

खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना खतांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. महागाव तालुक्यातील तब्बल सहा कृषी केंद्रांमध्ये खत विक्रीतील अनियमितता, शासन नियमांचे उल्लंघन तसेच दुकाने वारंवार बंद ठेवण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित सहा कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कृषी विभागाच्या तपासणी मोहिमेदरम्यान अनेक केंद्रांमध्ये खत साठा नोंदीत तफावत, विक्री रजिस्टर अपूर्ण, दरफलक नसणे, तसेच शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध करून न देण्याचे प्रकार निदर्शनास आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, अनेक केंद्रे कामकाजाच्या वेळेतही सतत बंद आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेतकरी खतासाठी तासन्तास प्रतीक्षा करत असताना काही संचालक मात्र नियमांकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार करत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. यानंतर कृषी विभागाने संबंधित केंद्र चालकांना नोटिसा बजावत स्पष्टीकरण मागविले असून, प्राप्त अहवालाच्या आधारे कठोर कारवाईसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.

या कारवाईमुळे तालुक्यातील कृषी केंद्र चालकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, नियम पाळा अन्यथा परवाना गमवा, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, खरीप हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये,खतांचा पुरवठा पारदर्शक आणि सुरळीत राहावा यासाठी कृषी विभागाने पुढील काळातही धडक तपासणी मोहीम सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या