महागाव तालुक्यातील धनोडा येथील एका पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.प्रथम २१०० रुपयांची ५ लिटरची ऑईल कॅन खरेदी करा, त्यानंतरच डिझेल मिळेल,असे कथितपणे सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सध्या शेती हंगाम सुरू असल्यामुळे ट्रॅक्टर,पंप व कृषी उपकरणांसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज भासत आहे. अशा वेळी पेट्रोल पंपावरील या कथित अटीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर गेल्यानंतर त्यांना विविध कारणे देत परत पाठविले जाते.
दरम्यान, प्रशासनाच्या सूचनांनुसार पेट्रोल पंप चालकांनी वाहनाचे आर.सी. बुक व आधार क्रमांकाची पडताळणी करून कॅनमध्ये मर्यादित प्रमाणात इंधन देणे अपेक्षित आहे. तसेच अत्यावश्यक सेवा व शासकीय वापरासाठी इंधन राखीव ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. प्रत्येक पेट्रोल पंप चालकाने नियमानुसार ठरावीक प्रमाणात इंधन उपलब्ध ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मात्र, धनोडा येथील पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना कथितपणे ऑईल कॅन खरेदीची सक्ती केली जात असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा प्रकार ग्राहकांची सक्तीची विक्री व आर्थिक शोषण ठरत नाही का, असा सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत.
या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे. आता पुरवठा विभाग, तेल कंपन्या आणि स्थानिक प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण महागाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.