महागावात ‘आडवी बाटली’चा फैसला आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात ! दारूबंदी मतदानाचा चौकशी अहवाल सादर;  महिलांच्या जनमताला न्याय मिळणार ! 

 लोकवेध न्यूज नेटवर्क / २५ मे.

 

 महागाव :- 

 

महागाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील दारूबंदीचा मुद्दा आता अंतिम निर्णयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. महिलांच्या तीव्र आंदोलनानंतर पार पडलेल्या गुप्त मतदान प्रक्रियेची चौकशी पूर्ण झाली असून तहसीलदारांनी आपला सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.त्यामुळे आता प्रशासनाचा अंतिम निर्णय काय येणार, याकडे संपूर्ण महागावचे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक १ मधील देशी दारू दुकान आणि लगतच्या ‘बैठक’ वाईन बारविरोधात स्थानिक महिलांनी जोरदार आंदोलन उभारले होते.दारू दुकानाजवळ बाजारपेठ,शाळकरी मुलींचा ऑटो पॉइंट तसेच सततची गर्दी असल्याने परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप महिलांनी केला होता.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या तैलचित्रालगत दारू दुकान सुरू असल्यानेही नागरिकांमध्ये संतापाची भावना होती.

 

महिलांच्या मागणीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्गदर्शनाखाली १६ मार्च रोजी गुप्त मतदान घेण्यात आले. या मतदानात दारूबंदीच्या बाजूने स्पष्ट जनमत दिसून आले.एकूण १४५ मतदारांपैकी ७७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यामध्ये तब्बल ६९ मतदारांनी ‘आडवी बाटली’च्या बाजूने कौल दिला,तर ‘उभी बाटली’च्या समर्थनार्थ केवळ ७ मते पडली. एक मत वादग्रस्त ठरले होते.

मात्र मतदानानंतर मतदार यादीवर गंभीर आक्षेप घेण्यात आले. काही मृत व्यक्तींची नावे यादीत असल्याचा तसेच काही नावे दुबार असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार अभय मस्के यांना चौकशीचे आदेश दिले होते.

तहसीलदारांच्या चौकशीत पाच महिला मतदार मयत असल्याचे, तर तीन नावे दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील संपूर्ण अहवाल आता जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून अंतिम निर्णय जिल्हाधिकारी स्तरावर घेतला जाणार आहे.

दरम्यान, दारूबंदी महिला संघर्ष समितीने जनतेच्या कौलाचा सन्मान राखत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासन महिलांच्या जनमताला मान देणार की नव्याने मतदान प्रक्रिया राबविणार, याबाबत महागावात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या