महागाव तालुक्यातील शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत तहसील प्रशासनाला जाब विचारला. यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत महागाव तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
महागाव तालुका दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, रखडलेली पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, तसेच घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या गरीब कुटुंबांना त्वरित लाभ देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यासोबतच पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असल्याचा मुद्दाही यावेळी जोरकसपणे उपस्थित करण्यात आला. घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतींमुळे महिला भगिनींसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले असून वाढती महागाई नागरिकांना होरपळून काढत असल्याची तीव्र भावना काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आली. इंधन व गॅसचे वाढलेले दर तातडीने कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांशी विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.शेतकरी, कष्टकरी, महिला आणि सामान्य जनता आज प्रचंड अडचणीत सापडली आहे. प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल,असा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान,सचिन नाईक यांच्या पहिल्याच तालुका दौऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.युवक काँग्रेस,महिला काँग्रेस,सेवा दल तसेच विविध फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी,ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.