दर्शन फोटो स्टुडिओचे संचालक राज पाटील नरवाडे व आर.के. क्लॉथ अँड साडी सेंटरचे संचालक दिनेश पाटील नरवाडे यांचे वडील, शेतीनिष्ठ शेतकरी विठ्ठलराव लक्ष्मणराव नरवाडे पाटील यांचे आज रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नरवाडे कुटुंबीयांसह महागाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विठ्ठलराव नरवाडे पाटील हे अत्यंत सालस, सोज्वळ, प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. शेतीशी अखेरपर्यंत निष्ठा जपत त्यांनी कष्ट, प्रामाणिकपणा आणि साधेपणाचा आदर्श आपल्या जीवनातून जपला. आपल्या प्रेमळ वागणुकीतून त्यांनी आयुष्यभर असंख्य माणसे जोडली.
आप्तेष्ट असोत अथवा मित्रपरिवार, प्रत्येकाच्या सुख-दुःखात ते मनापासून सहभागी होत. सामाजिक तसेच अध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच उत्स्फूर्त सहभाग असायचा. त्यांच्या आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या स्वभावामुळे मोठा आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि स्नेहसंबंधांचा गोतावळा त्यांनी निर्माण केला होता.
त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी एक प्रेमळ आधार, तर मित्रपरिवाराने एक जिव्हाळ्याचा स्नेही गमावला आहे. माणूस निघून जातो; मात्र त्याने जपलेली माणसे, दिलेले प्रेम आणि त्याच्या आठवणी सदैव मनात जिवंत राहतात.
विठ्ठलराव नरवाडे पाटील यांच्या पार्थिव देहावर आज सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता महागाव येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, चार भाऊ, बहिणी, सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.
या दुःखद प्रसंगी नरवाडे कुटुंबीयांच्या दुःखात लोकवेध न्यूज परिवार मनःपूर्वक सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि नरवाडे परिवारास हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.