विजेच्या लपंडावाने हिवरा ग्रामस्थ संतप्त; जीव धोक्यात, अखेर ग्रामस्थांचा संताप व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्यक्त

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०६ ऑगस्ट 

 

 महागाव :- 

 

तालुक्यातील हिवरा गावात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वीज लपंडावामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गावातील आपली एकविरा नगरी या व्हॉट्सअॅप ग्रुपवर वीज समस्येवरून नागरिकांमध्ये तीव्र चर्चा रंगली.एका ग्रामस्थाने वारंवार वीज खंडित होत असल्याने आपल्या मुलाला साप चावण्याची वेळ आली असती तर त्याची जबाबदारी कोण घेणार,असा संतप्त सवाल उपस्थित केला.तसेच गावातील गंभीर वीज समस्येकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला.

दरम्यान, काही नागरिकांनी वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर झांपरिंग (जंपर) तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले असून दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.मात्र, वारंवार उद्भवणाऱ्या अशा समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की,वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे अपघाताची भीती वाढली असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासासह दैनंदिन कामांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे महावितरणने हिवरा गावातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या