राखीच्या नाजूक धाग्यांत प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे बंध गुंफत संज्ञा संवर्धन संस्था संचालित कल्पतरू विशेष शाळा, बुटीबोरी येथे रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष विद्यार्थ्यांच्या निरागस हास्याने आणि उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण शाळेचा परिसर आनंदाने भारून गेला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी एकमेकांना राख्या बांधून बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा आनंद अनुभवला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम,जिव्हाळा, परस्पर विश्वास, काळजी आणि सहकार्याची भावना रुजविण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक व रंगीबेरंगी पोशाख परिधान केले होते. त्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. राखी बांधताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह हा कार्यक्रमाचा सर्वात भावस्पर्शी क्षण ठरला.
विशेष शिक्षिका सौ.शीतल खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचे महत्त्व समजावून सांगितले. बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, आपुलकी,विश्वास तसेच एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देण्याची भावना याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.प्रेम, काळजी, विश्वास आणि परस्पर सहकार्य हीच कोणत्याही नात्याची खरी ताकद असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत प्रेम आणि बंधुभावाचा संदेश दिला. विशेष विद्यार्थ्यांच्या सहभागातून साजऱ्या झालेल्या या उपक्रमाने रक्षाबंधन म्हणजे केवळ राखीचा धागा नव्हे, तर माणुसकी, जिव्हाळा आणि आपुलकी जोडणारा भावबंध आहे, हा सुंदर संदेश दिला.