आठवड्यात दोन घरफोड्या; महागावात चोरांचा सुळसुळाट, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल
लोकवेध न्यूज नेटवर्क / ०६ एप्रिल
महागाव :-
महागाव शहरात चोरीच्या घटनांनी चिंतेची पातळी ओलांडली असून, अवघ्या एका आठवड्यात दुसरी मोठी चोरी उघडकीस आली आहे.येथील जिल्हा परिषद जुन्या शाळेच्या इमारतीत असलेल्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून २९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,निवृत्ती नामदेव पाटील (वय ३९, रा. माणकेश्वर ता. उमरखेड) हे महाविद्यालयात ग्रंथालय परिचर म्हणून गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत आहेत. १ मे रोजी शैक्षणिक कार्यक्रमानंतर त्यांनी कार्यालय बंद केले होते व नंतर कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.
३ मे रोजी सायंकाळी ते परत आल्यानंतर कार्यालयाचे कुलूप तुटलेले दिसून आले. आत पाहणी केली असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. संगणक, प्रिंटर, मॉनिटर आणि यूपीएस असा एकूण २९,४५० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
दरम्यान, उटी येथे नुकत्याच घडलेल्या १४ लाखांच्या घरफोडीनंतर ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सतत वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, तातडीने कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

